Advertisement
‘साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ यांच्या साहित्यावर प्रबंध
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पदवी प्रदान
सोलापूर : जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना ‘साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ यांच्या साहित्यावरील प्रबंधासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी सर्व प्रबंधकारांत वेगळा विषय सादर करणारे लक्ष्मणराव ढोबळे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. समाजाचे पाश तोडून मोठ्या कष्टातून शिक्षण घेणारे आणि तेवढ्याच हिंमतीने शाहू शिक्षण संस्थेची उभारणी करणारे लक्ष्मणराव ढोबळे यांनी प्राध्यापक म्हणून कारकिर्द गाजवली आणि तेवढ्याच ताकदीने त्यांनी राजकीय क्षेत्रही आपल्या शब्दवाणीच्या बळावर जिंकले. आजही ते राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. ‘शब्दप्रभू’ म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे, असे लक्ष्मणराव ढोबळे यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण प्रबंध सादर केल्याने ते आता डॉक्टर म्हणूनही ओळखले जातील. आपण सादर केलेला प्रबंध हा विद्यार्थ्यांना तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास करणार्यांना फायेदशीर तसेच दिशादर्शक ठरेल, याचे मोठे समाधान असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केली.
सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21वा दीक्षांत समारंभ गुरूवारी (ता. 18) विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात झाला. यावेळी एकूण 10 हजार 955 विद्यार्थ्यांना पदवी तसेच 89 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी तर 59 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. स्नातक, अधिष्ठाता, मान्यवरांनी बाराबंदीचा पोशाख परिधान केल्याने हा सोहळा वैशिष्ठ्यपूर्ण ठरला.
या दीक्षांत समारंभास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गोपाल मुगेरया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत लक्ष्णराव ढोबळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. तत्पूर्वी प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघाली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होते, त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरूवात झाली. या समारंभात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानवविज्ञान विद्याशाखा, आंतरविद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना तसेच 89 प्रबंधकारांना पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी 59 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे आदी उपस्थित होते.
वडीलांना ‘डॉक्टरेट’ मिळाले यांचा मोठा आनंद...
बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे, अजय साळुंखे यांच्यासह पदाधिकारी आणि मोजके कार्यकर्तेही पदवी प्रदान सोहळ्यास उपस्थित होते. माझे वडील माझे आदर्श आहेत, त्यांनी ज्ञानार्जनात सतत नाविन्य शोधले आहे, त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर डॉक्टरेट मिळविली याचा खूप मोठा आम्हाला आहे, अशी प्रतिक्रिया या समारंभास उपस्थित असलेल्या लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केली. बहुजन रयत परिषदेच्या राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
