Advertisement
पुणे : धनकवडीत राष्ट्रवादी परिवार मिलन दौऱ्यावर असताना बारामतीच्या एका महिलेने त्यांना खास भेट दिली. या लाडक्या बहिणीने उपमुख्यमंत्र्यांना शेवग्याच्या शेंगा भेट म्हणून दिल्या. या महिला समर्थकाने अजित पवारांना त्यांच्या गाडीजवळच गाठलं. अजित पवार गाडीमधून उतरुन काही पावलं पुढे चालथ आल्यानंतर ही महिला पुढे आली. तिच्या हातात एक पिशवी होती ज्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि काही भाज्या होत्या. ती पिशवी या महिलेने अजित पवारांच्या हातात टेकवली. प्रेमाने दिलेली भाजी स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी या लाडक्या बहिणीसमोर हात जोडत, "बायकोला सांगतो बहिणीने भाजी दिली आहे. आता तू बनवून मला खायला घाल," असं म्हटलं आणि सर्वच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
"दादा आम्ही बारामतीचेच आहोत," असं ही महिला म्हणाली. त्यावर अजित पवारांनी बारातमीच्या कुठल्या असं विचारलं असता त्या महिलेनं गावाचं नाव सांगितलं. या महिलेने अजित पवारांच्या हातात भाजीची पिशवी देत, "ही भाजी तुम्हाला आवडते असं आम्हाला बोलण्यातून कळलं. त्यामुळे तुम्ही ही भाजी तुम्ही करुन खा," असं अगदी प्रेमाने सांगितलं. अजित पवारांनी भाजीची ही पिशवी घेत मागे उभ्या असलेल्या आपल्या सुरक्षारक्षकाच्या हाती सोपवली.
