Advertisement
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कॉमेडियन आणि दिग्गज अभिनेते असरानी यांचे 84 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ‘गोवर्धन असरानी' असे पूर्ण नाव असलेल्या या सदाबहार हास्य कलाकाराने आपल्या अचूक ‘कॉमिक टाइमिंग' आणि खास शैलीने अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
पार्श्वभूमी आणि कारकीर्द
जयपूरमध्ये 1 जानेवारी 1941 रोजी जन्मलेल्या असरानी यांचे सुरुवातीचे शिक्षण जयपूरमधील सेंट झेवियर स्कूल येथे झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी राजस्थान कॉलेजमध्ये गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनयापूर्वी रेडिओ आर्टिस्ट म्हणूनही काम केले होते.
संघर्षमय पदार्पण
असरानी यांनी 1960 च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, पण बॉलिवूडमध्ये पाय रोवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. खूप संघर्षानंतर त्यांना जया भादुरी अभिनित ‘गुड्डी' या चित्रपटातून संधी मिळाली. हा चित्रपट हिट झाला, पण तरीही सुरुवातीला लोक त्यांना 'कमर्शियल ॲक्टर' मानत नव्हते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, दिग्दर्शक गुलजार यांनीही त्यांना सुरुवातीला 'कमर्शियल ॲक्टर' मानले नव्हते, ते म्हणाले होते, "ना ना... काहीतरी वेगळाच चेहरा आहे." मात्र, एकदा त्यांनी अभिनयात आपले कौशल्य सिद्ध केले, तेव्हा त्यांना मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही आणि त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
