#

Advertisement

Monday, October 20, 2025, October 20, 2025 WIB
Last Updated 2025-10-21T06:33:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात लक्ष्मणराव ढोबळे यांची भूमिका महत्वाची ठरणार ?

Advertisement

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्याच्या राजकारणात उलथापालथ

सोलापूर : जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यासह अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात उलथापालथ सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षालाही सोलापूर जिल्ह्यात जोरदार धक्का बसणार असून, पक्षाचे निष्ठावान मानले जाणारे माजी आमदार बबनदादा शिंदे हे आपल्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, त्यांच्यासोबतच माजी आमदार राजन पाटील आणि दिलीप माने हे देखील भाजपमध्ये सामील होत असल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. या नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठे खिंडार पडणार असल्याचे मानले जात आहे. भाजपच्या या 'ऑपरेशन लोटस' मुळे विशेषतः शरद पवार गटाला हा मोठा धक्का बसणार असल्याचे सांगितले जात आहे. अशावेळी शरद पवार यांचे जवळचे मानले जाणारे त्यांचे शिष्य ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. 


सोलापुरात सध्या भाजपाकडून 'ऑपरेशन लोटस' सुरु असले तरी हे काही नवीन नाही. यापूर्वीही भाजपाने ही रणनीती खेळली आहे. परंतु, सोलापुरात भाजपाला पक्षात आलेली माणसे जपता आली नाहीत, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. लक्ष्मणराव ढोबळे यांचाच विचार करता, त्यांनी सुमारे अकरा वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. वास्तविक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या रूपात भारतीय जनता पक्षाला २० वर्षे आमदार, १० वर्षापेक्षा जास्त काळ मंत्रीपद याचा अनुभव असलेले उच्चशिक्षित रेडिमेड नेते ढोबळे यांच्या रूपात मिळाले होते. ढोबळे यांचा अनुभव आणि पंधरा-वीस मतदारसंघातील बहुजन रयत परिषद ही त्यांची संघटना व मागासवर्गीय नेतृत्व असलेला चेहरा, यातुन भाजपाने ढोबळे यांचा उपयोग करून घ्यायला पाहिजे होता. परंतु, भाजपने महाराष्ट्र राज्याचे पक्ष प्रवक्ते पद देऊन ढोबळे यांची बोळवण केली, त्यांच्या अनुभवाचे, नेतृत्वाचे कुठे मूल्यांकन केले नाही, असे दिसून आल्याने व वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने ढोबळे यांनी भाजप पक्ष सोडला. भाजपकडे सत्ता असल्याने नेतेमंडळींचे इनकमिंग सुरु असले तरी भाजपा हा परंपरागत जुन्या नेत्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करतो, हे अनेकांनी मान्य केले आहे. भाजपला मोहिते पाटील यांना देखील सांभाळून घेता आले नाही, तीच चूक पुन्हा उत्तम जानकर यांच्या बाबतीत भाजपाने केली. माजी आमदार प्रशांत परिचारक यांची देखील महामंडळावर वर्णी लावत बोळवण केली. यावरून भाजपला सोलापुरात तरी माणसे संभाळता येत नाहीत, असा संदेश नकळतपणे सगळीकडे गेला आहे. विशेष म्हणजे आजही सोलापुरात भाजपा 'ऑपरेशन लोटस' राबवित असले तरी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर एकेक निसटून परत ज्या-त्या पक्षात जाणार, हे राजकीय तज्ज्ञ मंडळी छातीठोकपणे सांगत आहेत.  

लोकसभेला भाजपाने उमेदवारी चुकवली  : ॲड. रमेश जोशी
सोलापूर लोकसभा निवडणुकीत रामभाऊ सातपुते यांना पराभवाला सामोरे जावे लागले. याबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मचिंतन केलेले दिसत नाही, याबाबत मंगळवेढा येथील ॲड. रमेश जोशी यांनी सातत्याने आपल्या लेखातून  भाजपचे कान टोचले आहेत. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे किंवा त्यांच्या उच्चशिक्षित कन्या ॲड. कोमल साळुंखे यांना भाजपने उमेदवारी दिली असती तर ? आज चित्र वेगळे असते. सोलापुरात भाजपाचा खासदार असता असे, ॲड. रमेश जोशी यांनी आपल्या लेखात आणि जाहीरपणेही म्हटले आहे. विशेष म्हणजे ढोबळे आणि जोशी यांच्यात एकेकाळी विविवाद होते, त्यानंतरही ॲड. जोशी यांनी आपली भूमिका मांडताना भाजपाची ढोबळे यांच्याबाबत झालेली चूक उघडपणे मांडली आहे.

जाणती माणसं टिकवली पाहिजेत : ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने काय करायला हवे होते, हे त्यानंतरच्या निकालावरून स्पष्ट झालेच आहे. मतदारसंघाची पूर्ण माहिती असणारा उमेदवार देणे अपेक्षित होते. ढोबळे साहेब यांना उमेदवारी मिळाली असती तर त्यांची गावांतील प्रत्येक ठिकाणची यंत्रणा निवडणुकीसाठी प्रचारास सज्ज होती. ढोबळे साहेबांच्या पंधरा-वीस जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्था हायस्कूल यांच्या शिक्षकांची संख्या मोठी आहे, याचा उपयोग नक्कीच झाला असता. परंतु, ती संधी भाजपने स्वतःहून घालवली, असे अनेक जन म्हणतात. ढोबळे साहेब यांना उमेदवारी आज ना उद्या मिळेलच. ढोबळे साहेब असो किंवा अन्य कोणी भाजपाने जाणती माणसं पक्षात सामावून घेतली पाहिजेत, टिकवली पाहिजेत. पण, हे होताना दिसत नाही, याची जाणीव पक्षाला किंवा श्रेष्ठींना असायला हवी, अशी माझी अपेक्षा आहे.