Advertisement
दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणलेले आहेत. अशातच आता लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. ‘जर पाकिस्तानला जगाच्या नकाशावर टिकून राहायचे असेल तर त्याने कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद थांबवावा, अन्यथा आम्ही संयम विसरू आणि पाकिस्तानला नकाशावरून मिटवून टाकू’ असं द्विवेदी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता भारत पाकिस्तानती कोणतीही दहशतवादी कारवाई खपवून घेणार नाही हे स्पष्ट होत आहे.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राजस्थानमधील अनुपगड येथील लष्करी चौकीवर बोलताना पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, भारतीय सैन्य आगामी काळात कोणताही संयम दाखवणार नाही. जर पाकिस्तानने दहशतवादाला आळा घातला नाही किंवा दहशतवाद्यांची मदत थांबवली नाही, तर ऑपरेशन सिंदूर 2.0 राबवले जाईल आणि आम्ही पाकिस्तानचा खात्मा करू. इतिहासात जमा व्हायचे की नाही याचा विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची जबाबदारी आता पाकिस्तानची आहे.
पुढे बोलताना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, यावेळी आम्ही ऑपरेशन सिंदूर 1.0 सारखा संयम बाळगणार नाही. आगामी काळात आम्ही अशी कारवाई करू की ज्यामुळे पाकिस्तानला जगात आपले स्थान टिकवायचे की नाही याचा पुनर्विचार करावा लागेल. पाकिस्तानला जगात रहायचे असेल तर त्यांना दहशतवाद थांबवावा लागेल. आगामी काळात ऑपरेशन सिंदूर 2.0 साठी लष्कराने तयार राहावे, जर देवाची इच्छा असेल तर तुम्हाला लढण्याची लवकरच संधी मिळेल.
