Advertisement
अनिल सावंत ; आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक
मंगळवेढा : विधानसभेत माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकीत संधी देताना शरद पवार यांच्या विचाराची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू, असे मत राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत यांनी व्यक्त केले. मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार पक्ष) बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अनिल सावंत हे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले आदी उपस्थित होते.
अनिल सावंत म्हणाले की, नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. माझ्यासाठी निवडणुकीत झटलेल्या कार्यकत्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, ही माझी जबाबदारी आहे. मी माझी संपूर्ण ताकद निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी लावणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची (शरदचंद्र पवार पक्ष) सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार येणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या स्वरूपात लढवायच्या आहेत. परंतु, आपला पक्ष म्हणून प्रथम आपली तयारी करणे आवश्यक असून आपल्या पक्षातील इच्छुक उमेदवाराचे मत विचारात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकदिलाने काम करून पक्षाच्या उमेदवारांना विजयी करणे, हीच आपली प्राथमिकता आहे, असे विचार मांडले.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, नगरपरिषद निवडणुकीत सर्वांनी ताकदीने व एकजुटीने लढा देऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम उमेदवार उभा करावा. स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस किसन गवळी, सुरेश कट्टे, अॅड. विनायक नागणे, माणिक गुंगे, मुजमिल काझी, मायाप्पा प्रक्षाळे, दत्तात्रय शिर्के, पांडुरंग जावळे, संतोष गोवे, अजिंक्य बेंदरे, जमीर इनामदार, देवदत्त पवार, सीताराम भगरे, स्मिता अवघडे, मंदाकिनी सावजी, वंदना जगताप, भाग्यश्री माळी उपस्थित होते. प्रास्ताविक शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी यांनी केले, तर राजाभाऊ चेळेकर यांनी आभार मानले.
