Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत विरोधकांवर टोलेबाजी
मंगळवेढा : नगरपालिकेचा सातबारा आपल्याच नावावर असल्यासारखे वागणाऱ्यांना बाजूला करा आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या बैठकीत माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
मंगळवेढा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विचारविनिमय बैठकीत डॉ. ढोबळे यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली. ते म्हणाले की, काही जणांनी नगरपालिकेवर तिसरा मजला बांधून कायमस्वरूपी मुक्कामच करण्याची तयारी केली आहे. नगरपालिकेच्या खर्चावर नाश्ता करणाऱ्यांना आता त्यांच्या जागी बसवण्याची वेळ आली आहे. यावेळी सत्तेचा स्वाद नव्हे, तर उपवासाची वेळ त्यांच्यावर येईल, असा सडेतोड हल्ला ढोबळे यांनी आपल्या नेहमीच्या टोलेबाज शैलीत केला, त्यांच्या या विधानाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. या बैठकीस जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले, शहराध्यक्ष चंद्रशेखर कॉडूभैरी तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.
दरम्यान, नगराध्यक्षा पदासाठी आठ आणि नगरसेवक पदासाठी २० पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी तयारी दर्शवली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.
राजकीय समीकरणात खळबळ
ढोबळे आणि सावंत यांच्या विधानांनी नगरपालिकेच्या आगामी रणधुमाळीला आगाऊ ठिणगी पडली आहे. जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले यांनी आघाडीचे महत्त्व अधोरेखित करत नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, असे सांगितले. शहराध्यक्ष चंद्रशेखर कॉडूभैरी म्हणाले की, १९९९ पासून मंगळवेढा तालुका शरद पवार साहेबांच्या विचारांशी निष्ठावंत आहे. जुने-नवे गट, आघाड्या आणि स्वबळावर लढण्याची तयारी यामुळे मंगळवेढ्याच्या राजकारणात चैतन्य आणि चुरस दोन्ही वाढल्या आहेत.
आघाडी होण्यासाठी प्रयत्न करणार !
भैरवनाथ उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले. मंगळवेळ्यात नगराध्यक्षा पद राष्ट्रबादीकडेच राहिले पाहिजे. आघाडी होण्याचा प्रयत्न करू. पण प्रतिसाद न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) स्वबळावर निवडणूक लढवेल.
