Advertisement
राज्यभरातील समाज संघटनांकडून धाराशिव जिल्हाधिकार्यांना निवेदने
सोलापूर : महाराष्ट्र राज्य बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांची अनुसुचित जातींचे अ, ब, क, ड नुसार उपवर्गीकरण मुद्यावर बदनामी करणार्या व्यक्तींवर तातडीने गुन्हा नोंदवावा आणि कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर, जिल्हाध्यक्ष योगेश येडाळे यांनी धाराशिव जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. राज्यभरातून जिल्हाधिकार्यांना या संदर्भातील निवेदने दिली जात असताना आज महराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे, प्रदेशाध्यक्ष कैलासभाऊ खंदारे यांनीही निवेदनाद्वारे मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या भूमिकेस पाठींबा देत उपवर्गीकरण प्रकरणी त्यांची बदनामी करणार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. लहुजी शक्ती सेनेचे प्रवक्ते मारूती लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मोरे यांनी निवेदन देत बदनामी करणार्यांचा तिव्र निषेध केला. तुळजापुर तालुक्यातील लहुजी नगर, मंगरूळ येथील लहुजी स्वराज सेनेनेही धाराशिव जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे. संस्थापक अध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी अनुसूचितींचे अ, ब, क, ड नुसार उपवर्गीकरणाच्या डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांनी मांडलेल्या भूमिकेस जाहीर पाठींबा व्यक्त करीत साहेबांची बदनामी सहन करणार नाही, असा स्पष्ट इशाराही निवेदनातून दिला आहे.
धाराशिव जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये विविध संघटनांनी म्हंटले आहे की, अनुसुचित जातीमध्ये लोकसंख्येप्रमाणे अ,ब, क,ड वर्गीकरण करण्याबाबत एका वृत्तवाहिनीना प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांनी मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी अनुसुचित जातीमध्ये 59 जातींचा समावेश आहे. त्याचे उपवर्गीकरण करून 59 जातींंना लोकसंख्येप्रमाणे न्याय देण्यासंबंधी मागणी केली, गेली 40 वर्षे झाले या उपवर्गीकरण करण्यासंबंधी प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे हे पाठपुरावा करीत आहेत. आता कुठे सर्वोच्च न्यायालयाने याची दाखल घेऊन अनुसुचित जातींमध्ये अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाला सूचना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सदरील अनुुसुचित जातींच्यावतीने प्रतिनिधी म्हणून प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदनही केले आहेत. परंतु, महाराष्ट्रातील स्वतः बौध्द म्हणवून घेणार्या कपित सरोदे, बंटी थोरात, प्रबुध्द साठे यांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर टिका केली आहे व मातंग समाजावर अनेक आरोप केलेे आहेत. तेंव्हा या तीन व्यक्तींवर तत्काळ गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करावी. महाराष्ट्रात काही दंगल झाल्यास याला महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे. सदर व्यक्तींवर दि.07/10/2025 पर्यंत कारवाई करावी. अन्यथा दि. 08/07/2025 रोजी बहुजन रतय परिषद संघटनेसह राज्यभरातील विविध संघटना धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत आमरण उपोषण करतील, याची नोंद घ्यावी, असे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
