#

Advertisement

Saturday, October 4, 2025, October 04, 2025 WIB
Last Updated 2025-10-04T11:10:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पावसात भिजली संविधानाची प्रत, बाबासाहेबांची भाषणे आणि बौद्ध वाड्:मय

Advertisement

बार्टीचा  गलथान कारभार, महासंचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

पुणे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कार्यरत असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) या प्रतिष्ठित संस्थेच्या पुस्तक विभागातील अमूल्य  ठेवा पावसात भिजत, कुजत पडलेला आढळून आल्याने आंबेडकरी अनुयायामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  भारताचे संविधान, बाबासाहेबांची गाजलेली भाषणे, “बुद्ध व त्याचा धम्म”, “रुपयाची समस्या व त्यावरील उपाय”, “बुद्ध कि कार्ल मार्क्स” यांसारखी अनमोल पुस्तके येरवड्यातील कॉमर्स झोन आयटी पार्कजवळ असलेल्या आवारात अक्षरशः रस्त्यावर फेकल्यासारखी उघड्यावर ठेवलेली असून पाऊस, उन्हाळा व वाऱ्यामुळे ती लगदा झाल्याने बाबासाहेबांच्या प्रतिमेचा सरळसरळ अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.याप्रकरणी बार्टीचे महासंचालक सुनील वारे आणि पुस्तक विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी भीमछावा संघटना व इतर आंबेडकरी संघटनांनी केली.
याबाबत महिन्यांनमहिने अनेक कार्यकर्त्यांनी बार्टीला सूचना करूनही कोणतीच दखल न घेतल्याने संतापाच्या भरात कार्यकर्त्यांनी ही पुस्तके उचलून क्वीन्स गार्डन येथील बार्टी मुख्य कार्यालयात नेऊन अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

अचानक पुस्तकांची सवलत कमी , गरीब विद्यार्थ्यांना झळ : दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त संघटनांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर पुस्तके वाटली जातात. मात्र यंदा बार्टीने १ ऑक्टोबर २०२५ पासून पुस्तके मिळणाऱ्या सवलतीत कपात करून ८५% ऐवजी केवळ ५०% सवलत लागू केली आहे. यामुळे तळागाळातील विद्यार्थी व नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे.

बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई ढोबळे-साळुंखे यांनीही याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बार्टीच्या कारभाराबाबत आम्ही अनेकदा राज्य शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, येथील शासकीय कारभार सुधारत नाही. समाजातील विद्यार्थांना न्याय मिळावा अशीच आमची सातत्याने मागणी राहिली आहे. आत्ताचा झालेला प्रकारही योग्य नाही, संबंधितावर कारवाई व्हायलाच हवी.