Advertisement
दोन टप्प्यात होणार मतदान
दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत.बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 122 जागांची आवश्यकता आहे. बिहार विधानसभेत सध्या भाजपचे 80 आमदार, आरजेडीचे 77, जेडीयूचे 45 आणि काँग्रेसचे 19 आमदार आहेत.
बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. 14 नोव्हेंबरला मतमोजणी होईल असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केलं आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपवली जाईल असंही त्यांनी सांगितलं. निवडणूक आयागाचे 8.5 लाख कर्मचारी या प्रक्रियेत असतील अशी माहितीही त्यांनी दिली आहे. तसंच बिहार निवडणुकीसह 8 पोटनिवडणुका देखील होणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. बिहार निवडणुका केवळ लोकांसाठी सोप्या नसतील तर निवडणुका शांततेत आणि पारदर्शकतेने पार पडतील, असा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्यक्त केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, निवडणूक आयोगाने 24 जूनपासून मतदार यादी शुद्धीकरणाचे काम सुरू केले आहे. प्रुफ लिस्ट 1 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आली आणि सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली. त्यानंतर सर्वांना दावे आणि आक्षेप घेण्यासाठी योग्य वेळ देण्यात आला. अंतिम यादी 30 सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात आली. आताही जर काही दावे किंवा नावे जोडायची असतील तर ती जोडता येतील. 90 हजारांहून अधिक मतदान केंद्रं उभारली जातील आणि त्यापैकी 1044 महिला व्यवस्थापित करतील, सुरळीत दक्षता सुनिश्चित करण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर "वेब-कास्टिंग" केलं जाईल, असं ज्ञानेश कुमार म्हणाले.
कधी संपतोय कार्यकाळ?
बिहार विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2025 रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्यात नोव्हेंबरपर्यंत निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. मागील विधानसभा निवडणूक (2020) कोरोनाच्या संकटामुळे 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत घेण्यात आली होती. भारतामध्ये कोरोना महामारीच्या काळात ही पहिलीच मोठी निवडणूक होती आणि यासाठी अनेक नियम आणि मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या.
