Advertisement
आमदार रोहित पवार यांचे सूचक विधान
पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर आता फडणवीसांच्या टार्गेटवर उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचं सूचक विधान कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. राज्यातील ऊस उत्पादनातील वाढीच्या माध्यमातून साखर उद्योगाला चालना देण्यात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा (VSI) सर्वांत मोठा वाटा आहे. शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली अजितदादांसह सर्वपक्षीय नेते पक्षाच्या पलीकडं जाऊन केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेवर काम करतात. तरीही या संस्थेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश ही केवळ नियमित प्रक्रिया नाही तर भाजपाने आपला मोर्चा आता बारामतीकडं वळवल्याचा त्याचा अर्थ आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (व्हीएसआय) दिल्या जाणाऱ्या अनुदानाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून देण्यात आले आहेत. पहिल्यांदाच या इन्स्टिट्यूटसंदर्भात असा निर्णय शासनाकडून देण्यात आला आहे. राज्याचे साखर आयुक्त 60 दिवसांमध्ये शासनाला चौकशी अहवाल सादर करणार आहेत. हा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार शरद पवारांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे, पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सूचक विधान केले आहे.
रोहित पवार म्हणाले. भाजपला कुबड्यांची गरज नाही हे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी स्पष्ट केलं आणि सोबतच VSI च्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. हा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा तर प्रयत्न नाही ना! हे लवकरच स्पष्ट होईल, असा उल्लेख रोहित पवारांनी पोस्टमध्ये केला आहे. तसेच, "महत्त्वाचं म्हणजे जिथं आम्ही कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देतो तिथं सरकार मौन बाळगतं, चौकशी करत नाही, पण राजकीय द्वेषातून एका चांगल्या संस्थेची चौकशी करून संस्थेचं नाव बदनाम केलं जातं, हे भाजपाचं आधुनिक राजकारण आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
