Advertisement
पुणे : पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधल्या या जवळपास 40 एकर जमिनीची किंमत आहे किमान 1800 कोटी आहे. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला ही जमीन मिळालीय फक्त 300 कोटींना. ही जमीन आता सरकारी जमीन आहे. त्याच जमिनीवर डल्ला मारण्यात आला आहे. मुळची महार वतनाची जमीन पार्थ पवारांच्या घशात घालण्यात आली आहे. 'सारखं फुकट, सारखं माफ असं कसं चालेल म्हणणाऱ्या अजित पवारांच्या लेकानेच जमिन लाटल्याचं प्रकरण समोर आलं आहे. राजकीय वादळ उठल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे दिले आहेत.
या व्यवहारासाठी लागणारी तब्बल 21 कोटींची स्टँपड्युटीही माफ करण्यात आली आहे. फक्त 500 रुपयांच्या स्टँपपेपरवर या व्यवहाराचा करार करण्यात आला. सगळे नियम मोडून-तोडून अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांसाठी हा व्यवहार झाला आहे. कोरेगाव पार्क भागातल्या जवळपास 40 एकर जमिनीची पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केली. पार्थ पवारांच्या या कंपनीत त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत. 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली आहे.
कोरेगाव पार्क भागातील ही जमीन मूळ महार वतनाची आहे. आता ती सरकारी जमीन आहे. या जमिनीचा व्यवहार हा शीतल तेजवानी यांच्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत अमेडिया कंपनीनं केल्याचं दिसत आहे. प्रत्यक्षात खरेदी खत हे गायकवाड आणि 274 मूळ मालक यांच्यासोबत अमेडिया कंपनीनं केलं आहे.
पार्थ पवारांच्या कंपनीचा हा सगळा घोटाळा महसूल विभागाशी संबंधित आहे. यासंदर्भात महसूलमंत्र्यांना गाठल्यावर महसूलमंत्र्यांनी हात वर केले आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी याचा संबंध आहे, त्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनीही याबद्दल उत्तर देणं टाळलं आहे.
