Advertisement
बोपोडी येथील एका जमीन व्यवहारात कायदेशीर नियमाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
पुणे : पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनामुळे पुणे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, त्यांचे निलंबन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित कथित भूखंड गैरव्यवहारामुळे नव्हे, तर पुण्यातील बोपोडी येथील एका अत्यंत गंभीर जमीन प्रकरणात अनियमितता केल्यामुळे झाले आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनाचं मूळ बोपोडी येथील एका जमीन व्यवहारात आहे. ते पुणे शहर तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी कायदेशीर नियम आणि वस्तुस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं निदर्शनास आलं आहे.
बोपोडी येथील या जमिनीच्या मालकी हक्काच्या नोंदीमध्ये 'अॅग्रीकल्चर डेरीकडे' असे शासकीय विभागाचे नाव असतानाही, येवले यांनी आपल्या अनाधिकाराचा वापर करून अर्जदारांच्या बाजूने आदेश दिले. या गंभीर अनियमिततेमुळे शासकीय जमीन एका खासगी व्यक्तीस प्रदान करण्यात आली, ज्यामुळे शासकीय जमिनीचा अपहार झाला आहे. महसूल विभागाने हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं मानलं आहे. शासकीय अधिकारी म्हणून सूर्यकांत येवले यांची वर्तणूक बेजबाबदारपणाची आणि अशोभनीय असल्याचं नमूद करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मुंढवा येथील पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावावर झालेल्या दुसऱ्या एका जमीन घोटाळ्याचे आरोप चर्चेत आहेत. पार्थ पवार प्रकरणाचे आरोप समोर येताच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (माजी मुख्यमंत्री) यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे, एकाच वेळी दोन वेगवेगळ्या भूखंड प्रकरणांमध्ये कारवाई आणि चौकशीचे आदेश दिल्याने महसूल विभागात तणाव वाढला आहे.
