Advertisement
पिंपरी : पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. एसीबीने पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल 46 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. प्रमोद चिंतामणी (35) असं लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. हा पोलीस अधिकारी पिंपरी चिंचवड आयुक्तालयात आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. दरम्यान, एसीबीने पुणे शहरातील पेठ रस्त्यावर उंटाड्या मारुती मंदिरासमोर आरोपीला अटक केली. आरोपी चिंतामणीविरोधात पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशन, शहर आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूण दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती...
आरोपीने तक्रारदाराच्या आशिलाला गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्यासाठी आणि त्याच्या वडिलांच्या जामीन मिळवून देण्यासाठी एकूण दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे लेखी तक्रार केली होती. तक्रारदाराच्या वडिलांना एका गुन्ह्यात अटक झाली होती. पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी या प्रकरणाचा तपास करत होते. 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या पडताळणी कारवाईत आरोपीने अचानक आपल्या मागणीत प्रचंड वाढ केली. त्यांनी तक्रारदाराच्या आशिलाला मदत करण्यासाठी व जामीन मिळवून देण्यासाठी 2 कोटी रुपयांची लाच मागितली होती. यामध्ये 1 कोटी स्वतःसाठी आणि 1 कोटी त्यांच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकाला देण्याचं ठरलं होतं.
यापैकी 50 लाख रुपयांचा पहिला हप्ता लवकरात लवकर देण्याचे निश्चित झाले होते. त्यानंतर आज रविवारी एसीबीने सापळा रचला. यादरम्यान आरोपी प्रमोद चिंतामणीने उंटाड्या मारुती मंदिरासमोर तक्रारदाराकडून 46 लाख 50 हजारांची लाच स्वीकारली. एसीबीने प्रमोद चिंतामणीची झडती घेतली असता 45 लाख 50 हजार रुपयांची रक्कम सापडली.
