Advertisement
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आश्वासन
पुणे : जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनापोटी शासकीय नियमांनुसार शेतकऱ्यांना प्रतिएकर एक कोटी रुपयांचा मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.
या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वपूर्ण आणि शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भूसंपादन झालेल्या सात गावांतील शेतकरी प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत संबंधीच्या प्रस्तावाची माहिती दिली, ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. संपादित जमिनीच्या क्षेत्राच्या १० टक्के एवढा विकसित भूखंड औद्योगिक, वाणिज्यिक, निवासी किंवा संमिश्र प्रयोजनासाठी त्याच क्षेत्रात वाटप करण्यात येणार आहे. हा भूखंड किमान १०० चौरस मीटरचा असेल, याची हमी प्रशासनाने दिली आहे.
ज्या प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे घर संपादित झाले आहे, त्यांना 'एरोसिटी' मध्ये २५० चौरस मीटरचा निवासी भूखंड मोबदला दराने दिला जाईल. भूमिहीन होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना ७६० दिवसांच्या किमान कृषी मजुरीइतकी रोख रक्कम त्रैमासिक हप्त्यांमध्ये दिली जाईल. अल्पभूधारक प्रकल्पग्रस्तांना ५०० दिवसांच्या कृषी मजुरीएवढी रक्कम मिळेल. घर संपादन झालेल्या कुटुंबांना ४० हजार रुपये स्थलांतर अनुदान आणि प्रति गोठा ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाईल. तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका सदस्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (ITI) एका अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देऊन पात्रतेनुसार नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्हाधिकारी हुडी यांनी 'नियमांच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे,' असे स्पष्ट केले. या निर्णयामुळे पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.
