Advertisement
पार्थ पवार प्रकरणातील आरोपीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
अकोला : पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ उठवले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दिग्विजय सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाला असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रकरणावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शरद पवारांनी या संवेदनशील विषयावर बोलण्याची किंवा त्याबद्दल जबाबदारी घेण्याची स्पष्टपणे टाळटाळ केली. राजकीय विश्लेषकांच्या मते, हे विधान एकप्रकारे पार्थ पवारांवरील आरोपांपासून आणि या वादापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचे सूचक मानले जात आहे.
जमीन व्यवहार प्रकरणाबद्दल जेव्हा माध्यमांनी शरद पवार यांना विचारले, तेव्हा त्यांनी चेंडू थेट राज्याच्या गृहमंत्र्यांच्या कोर्टात टाकला. ते म्हणाले, या प्रश्नाचं उत्तर सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देतील. या व्यवहारातील आणखी एक कथित आरोपी शितल तेजवानी या त्यांच्या पतीसह विदेशात फरार झाल्याच्या वृत्तावरही पवारांनी अत्यंत गूढ प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत आहे, आरोप करणाऱ्यांनीच शोधून आणावे.
पुण्यातील सुमारे 40 एकर सरकारी (महार वतन) जमिनीच्या व्यवहारात अनियमितता झाल्याचा मुख्य आरोप पार्थ पवार यांच्यावर आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने (ज्यात त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील भागीदार आहेत) ही जमीन खरेदी केली. जमिनीची बाजार किंमत अंदाजे 1800 कोटी रुपये असताना, ती केवळ 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे.
