Advertisement
कर्जबाजारी व्हा, आणि कर्जमाफी मागा !
माळशिरस : सोसायटी काढायची, पुन्हा कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. हे अनेक वर्ष काम चालू आहे. याची चिंता करायचं काम नाही, असे वादग्रस्त विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर विखे यांनी टीका केली. पण, महायुती सरकार कर्जमाफी देणारच आहे, असे स्पष्टीकरण देत सारवासारव केली.
माळशिरस येथे प्रकाश पाटील यांच्या भाजप प्रवेशावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना विखे पाटील यांनी हा मुद्दा छेडला. त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करताना म्हटले, शेतकरी कर्जबाजारी होण्यापूर्वीच कर्जमाफीची मागणी करतात. ते म्हणाले, महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत. ते करणारच आहोत. आपण शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करणार आहोत. परंतु, तिथंपर्यंत आपलं काम थांबता कामा नये. उद्याच्या तरुणाच्या भविष्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल, उद्योग उभारावे लागणार आहे. विखे पाटील यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्ष आता काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
