Advertisement
पुणे महापालिका निवडणूक : पहिल्या दिवशी ३०० अर्ज संपले
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षामध्ये उमेदवारीसाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. पहिल्याच दिवशी ३०० इच्छूक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले. इच्छूकांसाठी अतिरिक्त अर्ज पक्ष कार्यालयाने उपलब्ध करून दिले आहेत. आरक्षणानंतर अनेक ठिकाणी सोयीस्कर आरक्षण पडल्याने इच्छूकांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.
महापालिकेची मागील निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. मार्च २०२२ मध्ये निवडणूक होणे अपेक्षित असताना ओबीसी आरक्षण प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने सर्वच निवडणूका पुढे ढकलल्या होत्या. न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया पूर्ण करीत आणली आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीत २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती. त्यावेळी पक्षाचे ४२ नगरसेवक निवडून आले होते. मोदी लाटेमुळे भाजपचे ९८ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचे नगरसेवक केवळ १० नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी ८ ते १० जागांचा फटका बसला होता. त्यानंतरच्या काळात राज्यात सत्ता फेरपालट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव अजित पवारांकडे गेले, तर दुसऱ्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे नाव मिळाले. ४४ पैकी ३८ पेक्षा अधिक नगरसेवक अजित पवार गटात गेल्याने शरद पवार गटात दुसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्त्यांना आता संधी निर्माण झाली आहे. याच कारणातून शरद पवार गटातून निवडणूक लढण्यास इच्छूकांची संख्या वाढत आहे.
