Advertisement
पक्षाच्या बैठकीत नक्की काय ठरलं
मुंबई : एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या सोबतही स्थानिक पातळीवर युतीचे दरवाजे शरद पवार यांनी खुले ठेवले आहेत. एकीकडे महायुतीतील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत युती करण्यात शरद पवार हे सकारात्मक आहेत. पण त्याच वेळी त्यांनी भाजपसोबत कोणत्याही स्थानिक निवडणुकीत युती करू नये असे स्पष्ट केले आहे. स्थानिक परिस्थिती आणि राजकीय समीकरणे पाहून युती किंवा आघाडीचा निर्णय घेण्याचे अधिकार पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला अधिक लवचिकपणे काम करता येईल.|
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला विभागाची दोन दिवसीय बैठक मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे सुरू आहे. या बैठकीच्या पहिल्याच दिवशी पक्ष नेतृत्वाकडून अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. नुकत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा या सुचना करण्यात आल्या आहेत. पक्षाचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रातील स्थानिक राजकीय परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यानुसार युती किंवा आघाडी करण्याबाबत निर्णय घेऊ शकतील अशी सुट त्यांना देण्यात आली आहे.
