Advertisement
पुणे : कोरेगाव पार्कजवळील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची आता चौकशी होणार आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिग्विजय पाटील, शितल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क विभागाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानंतर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भातील माहिती दिली. दिग्विजय पाटील, शितल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्या तरी पार्थ पवार यांचे नाव फिर्यादीने तक्रारीत दिलेले नाही त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. आपसात संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. स्टँम्प ड्युटी बुडवल्याचा तपास होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. शीतल तेजवानी पॉवर ऑफ अटर्नी आहेत. त्यांना जमीन खरेदी लिहून दिली आहे. लिहून घेणारे दिग्विजय यांना आरोपी करण्यात आलं आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार अधिकचा तपास केला जाईल. तारू हे सब रजिस्ट्रार होते असंही पोलिसांनी सांगितलं.
दिग्विजय अमरसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेव्हणे :
धाराशिव जिल्ह्यातील तेर गावचे रहिवासी दिग्विजय अमरसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेव्हणे अमरसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. म्हणजेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या भावाचा तो मुलगा आहे. अमरसिंह पाटील आणि सुनेत्रा पवार हे माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांचे सावत्र भाऊ-बहिण आहेत. मात्र, अमरसिंह पाटील आणि पदमसिंह पाटील यांच्यात कौटुंबिक सौहार्द नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये कोणतेही आर्थिक संबंध किंवा संयुक्त उद्योग नव्हते.दिग्विजय लहानपणापासूनच आपल्या आत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे म्हणजेच अजित पवार यांच्या घरी वाढले. त्याचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील बिबेवाडी येथे झाले, तर पुढील शिक्षण एमआयटी महाविद्यालयातून बी.ए. पदवीपर्यंत पूर्ण केले. सध्या दिग्विजय पाटील हे आई आणि आजीसह पुण्यात राहतात. तो पार्थ पवार याचा जवळचा मित्र असून दोघे बिझनेस पार्टनर आहेत.
