Advertisement
कोपरगाव : कोपरगाव शहरातील सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या उषाच्या आयुष्यात बालपणीच नियतीने मोठा आघात केला आणि तिचे वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर तिची आई अहिल्याबाई पवार यांनी कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून जबाबदारी स्वीकारली. मिळेल ते सफाईचे काम करून त्यांनी घराचा गाडा हाकला. दुसरीकडे, उषाचा भाऊ ज्ञानेश्वर पवार याने बहिणीच्या शिक्षणासाठी मदत म्हणून शहरातील रस्त्यांवर बूट पॉलिश करून हातभार लावला. आईचा घाम आणि भावाचे कष्ट हेच उषाच्या अभ्यासाचे इंधन बनले. याच उषा गंगाधर पवार या तरुणीने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन 'क्लास 1' अधिकारी होण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे.
गुरुवारी सायंकाळी MPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि जगातला सर्वोच्च आनंद घेऊन आला. उषा उत्तीर्ण झाल्याचे कळताच तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. हे अश्रू केवळ यशाचे नव्हते, तर आई आणि भावाच्या अथक परिश्रमांचे 'सोनं' झाल्याचे समाधान त्यात दडलेले होते.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून यशाचे शिखर गाठणाऱ्या उषाने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय तिच्या कर्तव्यनिष्ठ आईला आणि त्यागी भावाला दिले आहे.
माझं हे यश फक्त माझं नाही. हे माझ्या आईच्या घामाचं आणि भावाच्या कष्टाचं फळ आहे. त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं, त्याची परतफेड मी प्रामाणिक सेवेतून करू शकेन, हीच माझ्यासाठी खरी अभिमानाची गोष्ट आहे.” उषा पवार यांनी केवळ 'अधिकारी पद' मिळवलं नाही, तर हजारो गरीब, होतकरू तरुणांसाठी एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.
