Advertisement
खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांच्या भेटीला
मुंबई : बिहारमध्ये मतमोजणी सुरु असताना महाराष्ट्र राज्यातही अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने नवी समीकरणं पाहायला मिळत आहेत. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने युती केल्यानंतर आता पुण्यातही तो प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी आघाडीचा प्रस्ताव पाठवला असल्याचं अजित पवारांनीच कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. याआधी दत्तात्रय भरणे यांनी आघाडीस अनुकूल असून कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ असं म्हटलं होतं.
अजित पवार व सुप्रिया सुळे या भाऊ-बहिणीचा एकत्र येण्याबाबत संवाद झाला आहे. अजित पवार शरद पवारांशी चर्चा करतील, मग अंतिम निर्णय होईल, असा दावा पिंपरी चिंचवडमधले अजित पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे.
युगेंद्र पवार यांच्या विवाहसोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी
देश आणि राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असतानाच आज सुप्रिया सुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या होत्या. पण यामागे कोणतंही राजकीय कारण नसून सुप्रिया सुळे कौटुंबिक कारणासाठी गेल्या होत्या. राष्ट्रवादीचे युवा नेते आणि भाचा युगेंद्र पवार यांच्या विवाहसोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी सुप्रिया सुळेंनी वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लग्नासाठी आमंत्रण दिलं आहे. या भेटीत याशिवाय कोणती राजकीय चर्चा झाली का याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
