Advertisement
राष्ट्रवादी काग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उपप्रदेशाध्यक्ष ऍड. कोमल साळुंंखे-ढोबळे यांची प्रतिक्रिया
सोलापूर : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत एनडीएनं पुन्हा एकदा बाजी मारली. या विजयामागे फक्त मोठी आश्वासने नाहीत, तर अनेक छोट्या-मोठ्या रणनीतींनी काम केले आहे. एनडीएचा विजय हा केवळ योगायोग नाही, तर मोठ्या राजकीय मोर्चे बांधणीचा परिणाम आहे आणि हे मान्य करावे लागेल, अशी स्पष्ट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उपप्रदेशाध्यक्ष ऍड. कोमल साळुंंखे-ढोबळे यांनी व्यक्त केली.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्या स्थानिक पत्रकारांशी बोलत होत्या. ऍड. कोमल साळुंंखे-ढोबळे म्हणाल्या की, एनडीएने निवडणुकीत केंद्राची हमी विरुद्ध राज्यातील अस्थिरता, अशी चौकट साधत प्रचार केला. यावेळी देण्यात आलेल्या दुहेरी आश्वासनांमुळे मतदारांच्या मनात या पक्षाविषयी विश्वास निर्माण झाला. एनडीएने निवडणुकीच्या खूप आधी नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. बिहार मध्ये नीतीश कुमार हे खूप आश्वासक चेहरा मानले जातात, त्याचाही फायदा झाला असावा.
याशिवाय एनडीएने आपली तिकीट वाटप प्रक्रिया वेळेत आणि संघटित पद्धतीने पूर्ण केली, ज्यामुळे कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला. तिकीट वाटपात जातीय संतुलनाचे पूर्ण भान ठेवले गेल्याने सर्व ठिकाणी सर्व समावेश आणि योग्य उमेदवार दिले गेले यामुळेच विजयी उमेदवारांची संख्या वाढली. एनडीए नेतृत्वाने आपली सर्वात मोठी आव्हाने वेळेत ओळखली आणि त्यावर अभ्यास करीत उत्तरे शोधली. पक्षाबाबत सायलेंट वोटचा अर्थातच आमचा पक्ष आणि उमेदवार विजय झाल्यास काय होऊ शकते, याचा छुपा प्रचार केला गेला. याउलट महागठबंधनमध्ये जागा वाटपासाठी मोठी रस्सीखेंच अखेर पर्यंत सुरू होती, यातून काही ठिकाणी बंडखोरी झाली आणि याचाच फायदा एनडीएला होत गेला, असे ऍड. कोमल साळुंंखे-ढोबळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
