Advertisement
कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल
पुणे : कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर आहे. 1800 कोटी मूल्य असलेली जमीन 300 कोटी रुपयांत विकत घेतली, तसेच स्टँप ड्युटी म्हणून अवघे 500 रुपये भरले असे आरोप पार्थ पवार यांच्यावर होत असून विरोधकांनी हे प्रकरण लावून धरत पार्थ पवार, त्यांचे वडील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या जमीन गैरव्यवहार प्रकरणात आत्तापर्यंत शीतल तेजवानी , दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी या फरार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बावधन पोलीस ठाण्यात शीतल तेजवानी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ ॲटर्नी ही शीतल तेजवानी यांच्याकडे होती, त्यामुळे तेजवानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तिचा फोन बंद आहे. तिचा वास्तव्याचा जो पत्ता आहेत, तिथेही बावधन पोलिसांनी चौकशी केली, मात्र शीतल तेजवानी त्या पत्त्यावरील घरात आढळली नाही. त्यामुळे कदाचित शीतल तेजवानी ही परदेशात गेली असावी अशी शक्यता पोलिस विभागाकडून व्यक्त केली जात आहे. बावधन पोलिसांकडून या सर्व प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.
