Advertisement
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा पदावर नियुक्ती
मंगळवेढा : राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा पदावर अॅड. कोमल अजय साळुंखे (ढोबळे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनुसार त्यांना ही जबाबदारी दिली गेली आहे. अॅड. कोमल साळुंखे यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र राज्य पातळीवर नेत्तृत्व लाभल्याने या निवडीचे पक्षातील महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या यांनी स्वागत केले आहे. अॅड. कोमल साळुंखे या माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या आहेत, बहुजन रयत परिषद संघटनेच्या माध्यमातून त्या राज्यभरात सक्रिय आहेत, सोलापूर जिल्ह्यातही त्यांचा तळागळातील नागरिकांशी चांगला संपर्क आहे, याची दखल घेत शरद पवार यांनी सदर पदावर नियुक्तीचे निर्देश दिले होते, त्यानुसार अध्यक्ष रोहिणी एकनाथ खडसे यांनी अॅड. कोमल अजय साळुंखे (ढोबळे) यांची नियुक्ती केली आहे. माढा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते अॅड. कोमल साळुंखे यांनी नियुक्त पत्र स्विकारले.
मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजीत करण्यात आला होता. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात नियोजनासाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. कोमल अजय साळुंखे (ढोबळे) यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
अॅड. कोमल अजय साळुंखे (ढोबळे) म्हणाल्या की, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि वरिष्ठांच्या विश्वासू नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला उपप्रादेशाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, त्याबद्दल मी आपली सर्वांची आभारी आहे. पक्ष वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान आणि गर्व वाटतो. कारण, आमच्या कुटुंबाची राजकीय सुरवातच साहेबांच्या सावलीत झाली आहे. आज, ही हा वटवृक्ष सर्वांना आपल्या छायेत सामावून घेत आहे. यामुळेच आज, पक्षाची सेवा करण्याची संधी मिळत आहे. सर्व महिला कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे मी आभार मानते, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आपल्या सर्वांच्या साथीने आणि समर्थनाने मी या पदाची जबाबदारी पार पाडेन, अशी मी ग्वाही देते, अशी प्रतिक्रिया अॅड. कोमल साळुंखे यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, भैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष अनिल सावंत, रतनचंद शहा बंकेचे राहुल शहा, जिल्हाध्यक्ष ओ.बी.सी. अरूण तोडकर, जिल्हाध्यक्ष युवा सुरज देशमुख, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेख, सामाजिक व न्यायचे जिल्हाध्यक्ष धनंजय साठे, सोलापूर जिल्हा महिलाअध्यक्षा सुवर्णा शिवपुरे, जिल्हाध्यक्ष महिला युवती विनंती कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन मंगळवेढा तालुका व शहर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष व सर्व सेल (शरदचंद्र पवार) यांच्यावतीने करण्यात आल्याचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष पांडुरंग चाैगुले, मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी यांनी सांगितले.

