Advertisement
मुंबई: डिसेंबरमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता मावळली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्या दुरुस्तीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया 12 डिसेंबरऐवजी 22 डिसेंबरला पूर्ण होणार आहे. दरम्यान, या निवडणुकातील आरक्षणसंबंधी सुप्रीम कोर्टात शुक्रवारी 28 नोव्हेंबरला सुनावणी आहे. त्यामध्ये कोर्ट काय निर्णय देणार याकडेही लक्ष लागलेले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील ओबीसी आरक्षण मर्यादा या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण कायम ठेवावे, अशी मागणी एका बाजूने करण्यात आली, तर दुसऱ्या बाजूने 50 टक्के मर्यादा पाळण्याचा आग्रह धरण्यात आला. आरक्षणाचा कोटा ओलांडला असल्यास त्याची संपूर्ण यादी सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले. आयोगाने कोर्टात सांगितले की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम सध्या जाहीर होणार नाही. मात्र आधी जाहीर झालेल्या निवडणुकांना स्थगिती दिलेली नाही आणि अंतिम निर्णय पुढील सुनावणीत घेण्यात येईल.
