Advertisement
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपरिषद निवडणुकीची राज्याच्या राजकारणात चर्चा आहे. नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला निकाल आहे. पण, अनगरचा निकाल त्याआधीच लागला. अनगर नगरपरिषदेत 17 पैकी 17 जागा भाजपने बिनविरोध जिंकल्या. माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील नगराध्यक्षपदी निवडून आल्या. अनगर नगरपंचायतीमध्ये अनेक दशकांपासून राजन पाटील यांचं वर्चस्व आहे. या वर्चस्वाला उज्ज्वला थिटे यांनी आव्हान देण्याची हिम्मत दाखवली. राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांच्याविरोधात अजितदादा गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेससकडून उज्ज्वला थिटे निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. त्यांचे अपील तांत्रिक कारणातून फेटाळण्यात आले असले तरी त्यांनी राजन पाटील यांना थेट आव्हान दिले याची चर्चा मोहळ मध्ये रंगली आहे.
राजन पाटील समर्थकांनी थिटेंना अर्ज भरण्यापासून रोखण्यासाठी त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सरकारकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली. त्यानंतर सूचकाची सही नसल्याचे कारण देत तहसीलदारांनी उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद केला. त्यामुळे अनगरच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. प्राजक्ता पाटील नगराध्यक्ष बनल्या. या निर्णयाला उज्ज्वला थिटे यांनी कोर्टात आव्हान दिलं होतं.
आता उज्ज्वला थिटे यांचं अपील नेमके का फेटाळलं? याची माहिती सरकारी वकील प्रदिपसिंह राजपूत यांनी दिली. सूचकाची सही नसल्याने तसेच सुचकाचा मतदार क्रमांक चुकल्यानेच उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याचे कोर्टात सिद्ध केले. सूचकाची सही असणे बंधनकारक असते, तसेच अधिकाऱ्यांवर चुकीचे आरोप केले ते सर्व आरोप बिनबुडाचे आहेत हे देखील कोर्टाला पटवून दिले.मुळात उज्ज्वला थिटे यांनी सुरवातीला सही केल्याचा दावा केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सही खोडल्याचा दावा केला. मात्र त्यांच्या विधानात एकवाक्यता नव्हती हा मुद्दा देखील लक्षात घेतला गेला.
