Advertisement
आयोगाच्या यादीत नाव, कोणताही अडथळा नाही
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीच्या आत सर्व निवडणुका घेण्याचा आदेश दिल्याचा उल्लेख आयोगाने केलेला असताना 29 महापालिकांत दोन महापालिकांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली असली तरी निवडणुका घ्याव्यात असे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले आहेत. सोलापूर महापालिकेसाठी आरक्षण नियमातअसल्याने सोलापूर पालिका निवडणुकीत कोणताही अडथळा असणार नाही.
राज्यात नागपूर आणि चंद्रपूर, या दोनच महापालिका अशा आहेत की, जिथे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे येथे आधी 50 टक्क्यांच्या आत आरक्षण दिले जाईल, अशा पद्धतीने पुनर्रचना करून मगच तेथे निवडणूक घेतली जाईल, असा तर्क लावला जात होता. मात्र, निवडणूक आयुक्तांनी हे तर्क फेटाळले असून 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे, अशा ठिकाणी निवडणूक घेऊ नये, असे न्यायालयाने निकालात कुठेही म्हटलेले नाही. ही मर्यादा ओलांडलेल्या महापालिकांमध्येही निवडणूक घेता येईल आणि निकाल देखील जाहीर करता येईल. पण, हा निकाल ओबीसी आरक्षण आणि 50 टक्क्यांची ओलांडलेली मर्यादा याबाबत न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
