Advertisement
राज्याचे नवे क्रीडामंत्री अजित पवार होणार
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या शिफारशीनुसार राज्यपालांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडे असणारी खाती काढून घेतली आहेत. अजित पवार आता राज्याचे नवे क्रीडामंत्री होणार आहेत.
फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहून माणिकराव कोकाटेंकडे असणारी काढून घेण्याची शिफारस केली होती. राज्यापालांनी ही शिफारस मान्य केल्याने आता कोकाटेंकडे कोणतंही खातं नसून, बिनखात्याचे मंत्री झाले आहेत.
"माननीय देवेंद्र फडणवीसजी, मला तुम्ही 17 डिसेंबर 2025 रोजी लिहिलेलं पत्र प्राप्त झालं आहे ज्यामध्ये तुम्ही माणिकराव कोकाटे यांच्याकडे असणारं क्रीडा आणि तरुण कल्याण, अल्पसंख्यांक विकास खातं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवली जावी. मी या मागणीला मान्यता देत आहे," असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. म्हणजेच अजित पवार आता राज्याचे नवे क्रीडामंत्री होणार आहेत.
दरम्यान, माणिकराव कोकाटे हे सदनिका वाटपातील गैरव्यवहार अडचणीत सापडले आहेत. 1995 सालच्या शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 20 फेब्रुवारी 2025 रोजी प्रथम वर्ग न्यायालयाने हीच शिक्षा सुनावली आहे. माणिकराव कोकाटे यांनी अटक टाळण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली. मात्र हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्काळ सुनावणीस नकार दिला.
