Advertisement
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांची, आमची चर्चा झाली आहे. आम्ही दोघे इथले मोठे पक्ष आहोत. भाजपाने पाच वर्षं पुण्याचा चांगला विकास केला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा समोरासमोर लढताना दिसेल. असे असले तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, कोणतीही कटुता नसेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग येणार असून, युती-आघाडीसंदर्भातील चर्चांना वेग येईल. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना आमच्या शासनाने केलेलं काम पाहता कौल आमच्या बाजूने येईल, जनता आम्हाला पुन्हा शहर विकासाची संधी देईल असा विश्वास व्यक्त केला आहे.आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी युती होईल. तर काही ठिकाणी भाजपा-राष्ट्रवादीची युती होतानाही दिसेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याचा मला आनंद आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या भरवशावर चालणं हे लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं. न्यायालयाच्या निर्णयामुळे या संस्था दीर्घकाळ निर्वाचित प्रतिनिधींसिवाय होत्या. आता पुन्हा निवडणूक होत आहेत. जनता आम्हाला पुन्हा शहर विकासाची संधी देईल असा विश्वास आहे,असेही फडणवीस यांनी सांगितले.
