Advertisement
मालवण : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवणमध्ये सभेसाठी दाखल झाले, तेव्हा त्यांच्यासोबत दोन मोठ्या बॅगा होत्या. या बॅगेत पैसे भरले होते असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. मालवणमध्ये सभेसाठी आलेल्या एकनाथ शिंदेंनी जनतेसाठी कोणतेही घोषणा केली नाही. मात्र येताना त्यांनी आणलेल्या दोन जड बॅगा पैशाच्या होत्या आणि त्या पैशाचं रात्रभर वाटप झालं असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैशांच्या बॅगा आणल्या होत्या. निलेश राणे यांनी सुद्धा या पैसांचा वाटप केलं असा दावा करत वैभव नाईक यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. भाजपाचे पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप निलेश राणेंनी यापूर्वी केला आहे. त्यानंतर वैभव नाईक यांनीदेखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर व्हिडिओ शेअर केला आहे.
वैभव नाईकांनी एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. "एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले, परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत असल्याचे म्हटले आहे.
