Advertisement
नगराध्यक्ष पदासह अन्य उमेदवारांची निवड चुकल्याची चर्चा
मंगळवेढा : सोलापूर जिल्ह्याचे राजकारण ज्या नगरपरिषदांभोवती फिरते त्यातील मंगळवेढा नगरपरिषदेसाठी २० डिसेंबरला मतदान होत आहे. या नगरपरिषदेसाठी भारतीय जनता पक्ष विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडी, अशी थेट लढत होत आहे. मात्र, मतदानापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पिछाडीवर गेल्याचे चित्र दिसू लागले आहे. मुळातच विरोधी राजकीय पक्षांना आव्हान देण्याच्या प्रयत्नात भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी चुकीच्या व्यक्तीला उमेदवारी दिली गेल्याने याचा फटका नगरसेवक पदाच्या उमेदवारांवरही होत असल्याचे निरीक्षण पाब या संस्थेने नोंदिवले आहे.
मंगळवेढ्यातील निवडणूक प्रचार सध्या आरोप-प्रत्यारोपाने सुरू असताना मतदार मात्र वस्तुस्थिती जाणून आहेत. या निवडणुकीत भाजप विरोधात अन्य राजकीय पक्ष तसेच स्थानिक आघाडी, अशी स्थिती असताना सुरवातीला भाजपचे पारडे जड असल्याचे वाटत होते. परंतु, भाजपकडून उमेदवारांची निवडच चुकली असल्याची चर्चा त्यानंतर रंगात येवू लागली आहे. साम, दाम, दंड, भेद अशा कोणत्याही प्रकारे निवडणूक जिंकायची याकरीता पक्ष, गट फोडायचे अशी रणनिती भाजपने सर्वत्रच अवलंबलेली असताना मंगळवेढ्यातही ती आजमावण्याचा प्रयत्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला, याच कारणातून भाजपकडून उमेदवार निवडण्यात चूक झाल्याचे उघडपणे दिसत आहे.
मंगळवेढ्यात भाजप पक्ष रूजू नये याकरीता सुरवातीच्या काळात याच पक्षाला कडाडून विरोध करणारे तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि नेतेमंडळींच्या नावे खडे फोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजित जगताप यांच्या पत्नी सुप्रिया जगताप यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली गेली, विशेष म्हणजे यासाठी ज्याने भाजपा आमदारांनाही विरोध केला त्याच आमदार समाधान आवताडे यांनी जगताप यांच्या घरात उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केले. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून राधा सुरवसे, प्रा. तेजस्विनी कदम यासह अन्य नावांचीही चर्चा असताना सुप्रिया जगताप यांना उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गत खदखद तेंव्हाच सुरू झाली. जगताप पेक्षा अन्य उमेदवार हे कधीही आव्हान निर्माण करू शकले असते, अशी भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांची भूमिका होती. परंतु, सर्वेक्षणाचा मुद्दा पुढे रेटून आमदार आवताडे यांनी जगताप यांच्या घरात उमेदवारी दिली. अजित जगताप यांनी यापूर्वी नगरसेवक आणि जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष झाल्या तर आणखी निधी मिळून शहराच्या विकासाला गती येईल, या दृष्टिकोनातून त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली असल्याचे आमदार आवताडे सांगत होते, मात्र मंगळवेढ्याचा विकास किती झाला, खरंच कोणी केला हे सुज्ञ मतदार जाणून आहेत. विशेष म्हणजे पत्नीला भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतरही अजित जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला नाही, या प्रश्नांचे उत्तर आमदार आवताडे यांच्याकडेही नाही. एकुणच काय तर मंगळवेढ्यातील मतदारांना गृहीत धरून भाजपचे कामकाज सुरु आहे, याच कारणातून पक्षातील जाणती नेतेमंडळी शांत असून ते निवडणूक, प्रचार यापासून अलिप्त आहेत. याच कारणातून भाजपमध्ये दुफळी निर्माण झाल्याची स्थिती सध्या स्पष्टपणे जाणवू लागली आहे. विशेष म्हणजे प्रचारावेळी स्वत: अजित जगताप हे भरकटल्याप्रमाणे मुद्दे मांडत आहेत. जिकडे भेळ तिकडे खेळ अशी त्यांची भूमिका सुरवातीपासूनच राहिली असल्याचे त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी उघडपणे बोलतात. भाजप सारख्या पक्षाच्या सभेलाही किरकोळ गर्दी जमत आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या खिशाला असलेले कमळाचे बैच काढून वावरत असल्याचेही अनेक जण स्पष्टपणे सांगतात. याउलट मंगळवेढ्यात भाजप विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडीने भक्कमपणे उभी असून भाजपला थेट आव्हान दिले आहे. भाजपच्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांचे उमेदवार आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार यांची तुलना केली तर मतदारराजा आपला कौल निश्चीतच भाजप विरोधात देणार, हे वास्तव चित्र आहे, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचीच सत्ता येणार, असे मतदारच ठामपणे सांगत असल्याने मतदानापूर्वीच भाजपची पिछेहाट झाल्याचे दिसत आहे.
