Advertisement
मुंबई : महाविकास आघाडीत राज ठाकरेंच्या एन्ट्रीने मिठाचा खडा पडला. कारण, मनसेमुळे काँग्रेसने ठाकरे गटासोबत आघाडीबद्दल फारकत घेतली. पण, त्यानंतर काँग्रेस पक्ष आता महापालिका निवडणुकांमध्ये एकटा पडलाय का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील भेटीने आणखी एका आघाडीची चर्चा सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेतल्यानंतर मविआमध्ये फुट पडली. मनसे असेल तर आम्ही ठाकरे गटाला सोबत घेणार नाही अशी गर्जना काँग्रेसने केली. तर शरद पवार गटानेही काँग्रेससोबत जाण्यात फारसं स्वारस्य दाखवलं नाही. त्यामुळे सुरुवातीला एकट्याने निवडणुक लढण्याची ललकारी दिल्यानंतर आता आघाडीसाठी वंचितसमोर काँग्रेसने पायघड्या टाकल्या आहेत. मुंबई व्यतिरिक्त इतर महापालिकांमध्ये काँग्रेस - वंचित आघाडी व्हावी यासाठी प्रकाश आंबेडकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत चर्चा झाली आहे. मात्र, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीची ही पहिली वेळ नाही आहे. कधी दोघांना एकमेकांच्या दोस्तीचा फायदा झालाय तर कधी एकमेकांविरोधातल्या कुस्तीमुळे नुकसानंही झालं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी करताना ते शेवटपर्यंत आघाडी धर्म निभावतात का हे बघणं महत्वाचं आहे.
