#

Advertisement

Sunday, December 21, 2025, December 21, 2025 WIB
Last Updated 2025-12-21T11:49:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मंगळवेढ्यात दिसली माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची ताकद

Advertisement

नगरपरिषद निवडणुकीत तिर्थक्षेत्र विकास आघाडीला मोठे यश 

लक्ष्यवेधी प्रतिनिधी 

सोलापूर :  मंगळवेढा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा मोठा पराभव झाला आहे. या ठिकाणी दिग्गजांनी एकत्रित येत तीर्थक्षेत्र विकास आघाडी तयार केली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपली संपूर्ण ताकद या ठिकाणी पणाला लावली होती. याच कारणातून सोलापूर जिल्ह्याचे लक्ष मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीकडे लागले होते. मतदानापूर्वीच मंगळवेढ्याने आपला काैल तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना विशेषत: नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार  सुनंदा आवताडे यांना दिला होता, त्यामुळे त्या निवडून येतील, असा ठाम विश्वास प्रचारावेळी लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केला होता. यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपप्रदेशाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती झालेल्या ढोबळे यांच्या कन्या ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनीही प्रचारात सहभागी घेत विरोधकांपुढे आव्हान निर्माण केले होते. यासह बबनराव आवताडे आणि भगीरथ भालके यांनीही आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीसाठी लावली होती. याचाच परिणाम म्हणून नगराध्यक्षपदाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार सुनंदा आवताडे या २१२ मतांनी विजय झाल्या, भाजपला या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला.
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत 20 पैकी भाजपला आठ आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या आहेत. भाजपची एक जागा बिनविरोध झाली होती, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. मंगळवेढ्यात भाजप पिछाडीवर पडला असून याचा परिणाम आगमी निवडणुकीवरही दिसून येणार आहे.  

सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि 

नगरपंचायत निवडणूक नगराध्यक्ष पदाचा निकाल 

1. अक्कलकोट : भारतीय जनता पक्ष 

2. मैंदर्गी : भारतीय जनता पक्ष 

3. बार्शी : भारतीय जनता पक्ष 

4. अनगर : भारतीय जनता पक्ष 

5. दुधनी : शिवसेना शिंदे गट 

6. सांगोला : शिवसेना शिंदे गट 

7. मोहोळ :  शिवसेना शिंदे गट 

8. कुर्डूवाडी : शिवसेना ठाकरे गट 

9. मंगळवेढा : तीर्थक्षेत्र विकास आघाडी 

10. अकलूज : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी 

11. करमाळा : स्थानिक विकास आघाडी 

12. पंढरपूर : तीर्थक्षेत्र विकास आघाडी


सोलापूर जिल्ह्यात भाजपची स्वबळावर लढण्याची रणनीती चुकली? 

जिल्ह्यातील 12 पैकी केवळ ४ नगरपालिकेवर भारतीय जनता पक्ष विजयी झाला, तर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला 3 नगरपरिषदेवर सत्ता मिळवता आली. सोलापूर जिल्ह्यातील 12 पैकी 7 जागावर महायुतीची आघाडी तर 3 जागांवर स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याने भाजपसाठी हे एक मोठे अपयश मानले जात आहे. सोलापूर जिल्ह्याने शरद पवार यांना चांगला कौल दिला आहे. काँग्रेस मात्र सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार झाली असल्याची मानले जात आहे.जिल्ह्यात काँग्रेसचा नगराध्यक्ष पदावर एक ही उमेदवार विजयी झालेला नाही.

अक्कलकोट तालुक्यातील दोन्ही दिग्गज नेत्यांनी आपले गड राखले आहेत. भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा अक्कलकोट नगरपरिषदेवर एकतर्फी विजय मिळाला.  तब्बल 135 वर्षांची परंपरा मोडत मैंदर्गी नगरपरिषदेवर देखील भाजपाचा झेंडा फडकला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री  सिद्धाराम म्हेत्रे यांनी  होम ग्राउंड दुधनी नगरपरिषदेवर एकतर्फी दणदणीत विजय मिळवला. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुतणे  प्रथमेश म्हेत्रे नगराध्यक्ष पदावर विजयी

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपला राजकीय अनुभव किती मोठा आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले. येथे तिर्थक्षेत्र विकास आघाडीला मिळालेल्या यशात त्यांना मोठा वाटा असल्याचे मानले जाते. तर, भाजप आमदार समाधान आवताडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.  

अनगर नगरपरिषद अखेर बिनविरोध घोषित झाली आहे. भाजप नेते राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील अनगरच्या प्रथम नगराध्यक्ष झाल्या आहेत. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी चूरस पाहायला मिळाली. अखेर, निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी प्रमाणपत्र दिले. 

सांगोला नगरपरिषदेच्या  एकूण 20 जागांपैकी दोन आधीच बिनविरोध आल्या होत्या, शहाजी बापूंची एक हाती सत्ता येथे आली आहे. 17 जागांवर शहाजी बापूंची एक हाती आघाडी पहालया मिळाली. 

करमाळा नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार जयवंत जगताप यांच्या गटाला धक्का बसला. जयवंत जगतापांच्या पत्नी महानंदा उर्फ नंदिनीदेवी जगताप पराभूत झाल्या आहेत. अकलूज नगरपालिकेत खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.  राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रेश्मा आडगळे 2793 मतांनी विजयी झाले आहेत.