Advertisement
प्रभाग क्र. १० मध्ये बोगस मतदान पकडून दिल्याने विरोधकांचे कृत्य
मंगळवेढा : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी बोगस मतदान करणाऱ्या १२ महिलांना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पकडून याबाबतची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना देत असताना विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी ढोबळे याना धकाबुक्की केल्याने मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. याबाबत संबंधीतांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
मंगळवेढा नगरपरिषद निडणुकीसाठी एकुण ३१ मतदान केंद्रावर मतदान दिवसभर सुरळीत पार पडत असताना अखेरच्या टप्प्यात सर्वाधिक मतदान असलेल्या प्रभाग १० मधील ४ मतदान केंद्रावर सायंकाळी बोगस मतदान होत असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना दिली. त्यानुसार ढोबळे यांनी प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करीत संबंधित मतदारांचे ओळखपत्र, आधारकार्ड तपासण्याची विनंती केली, त्यावेळी बोगस मतदान करण्याऱ्या १२ महिला आढळून आल्या, त्या सर्वजण पंढरपूर येथील असून बोगस मतदान करण्यासाठी त्यांना पैसे दिले गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली असता, विरोधी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लक्ष्मणराव ढोबळे यांना धक्काबुक्की केली. त्यावेळी तेथे उपस्थित बहुजन रयत परिषेदेच्या कार्यकर्त्यानी विरोधकांना रोखले. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे कार्यकर्ते ही तेथे आल्याने मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचे बहुजन रयत परिषदेकडून सांगण्यात आले. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
