Advertisement
पुणे : महापालिका निवडणुकीत काही उमेदवार थेट जेलमधून निवडणूक लढताना दिसणार आहेत. अजित पवारांनी जेलमध्ये हत्येच्या आरोपाखाली बंद असलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अजित पवारांनी एक नव्हे तर तब्बल तिघांना एबी फॉर्म दिला आहे. आयुष कोमकरच्या हत्येच्या आरोपाखाली सध्या जेलमध्ये असणारं आंदेकर कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे.
नातवाच्या खुनाचा आरोप असलेल्या बंडू आंदेकर हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर आता लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्म दिल्याचं समोर आले आहे. हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या सोनाली आणि व लक्ष्मी आंदेकरला अजित पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 23 मधुन आंदेकर निवडणूक लढवणार आहेत. दोघीही तुरुंगातुन निवडणूक लढवणार आहेत. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. आंदेकरांच्या वकिलांच्या मार्फत हे फॉर्म भरण्यात आले. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
याशिवाय अजित पवारांनी गुंड गजा मारणेच्या पत्नीलाही उमेदवारी दिली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना प्रभाग क्रमांक 10, बावधन येथून एबी फॉर्म देण्यात आला आहे. जयश्री मारणे राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार असून त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. सत्र न्यायालयाने आंदेकर कुटुंबाला निवडणूक लढण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, कोर्टाने निवडणूक लढण्याची परवानगी देताना कोणतीही मिरवणूक, प्रचार यात्रा, घोषणाबाजी, सार्वजनिक भाषणे करू नये, अशी ताकीद दिली आहे. बंडू आंदेकरची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून तसेच वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर यांनाही विशेष मोक्का न्यायालयाने निवडणूक लढण्यास परवानगी दिली आहे.
