Advertisement
सोलापूर : सोलापूरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गोंधळ उडाला. भाजपचे 'एबी' फॉर्म वेळेत न पोहोचल्याने आणि शेवटच्या क्षणी ते दाखल करण्यावरून शिंदे यांची शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची वाट अडवत जोरदार घोषणाबाजी केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाला होता.
भाजपचे अधिकृत उमेदवार ठरवणारे 'एबी' फॉर्म वेळेत निवडणूक कार्यालयात आले नाहीत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत होती. शेवटच्या क्षणी भाजप शहराध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे एबी फॉर्म घेऊन कार्यालयात आले. यावेळी वेळ संपल्याचा दावा करीत शिंदे सेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तीन वाजून गेल्यानंतरही फॉर्म स्वीकारले जात असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची वाट अडवून धरली. "दादागिरी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी" अशा घोषणा देत काँग्रेस आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
