Advertisement
शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराचं घर फोडले
सांगली : मिरज-कुपवाडा महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. मिरजेत भाजप उमेदवाराच्या घरावर रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. उमेदवारांचे सुपुत्र संदीप व्हनमाने यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सागर वनखडे यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप केला आहे.
सांगलीच्या मिरज प्रभाग क्रमांक 3 मध्ये राजकीय वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले आहे. या प्रभागात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून सुनिता व्हनमाने या मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे सागर वनखंडे निवडणूक लढवत आहेत. बुधवारी रात्री (31 डिसेंबर 2025) याच वादातून सुनिता व्हनमाने यांच्या घरावर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने दगडफेक केली. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून निवडणुकीला हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे नुकसान केले. सुनिता व्हनमाने यांचे सुपुत्र संदीप व्हनमाने यांनी असा दावा केला आहे की, हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याच्या उद्देशानेच हा सर्व प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
