Advertisement
भाजपमधील वादाला मिरा भाईंदरमध्ये भावनिक वळण
मुंबई : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा भूकंप झाला आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्याच्या धक्क्यातून भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. वनिता यांना त्यांची मुलगी श्रद्धा बने हिला तिकीट मिळेल अशी त्यांना खात्री होती, मात्र नाव कापले गेल्याचे समजताच त्यांना हा तीव्र मानसिक धक्का बसला.
प्राथमिक माहितीनुसार,श्रद्धा बने यांचे नाव उमेदवारी यादीतून वगळण्यात आल्याचे स्पष्ट होताच वनिता बने यांच्यावर मानसिक दडपण आले. त्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत दुखू लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांनी तातडीने त्यांना मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
रुग्णालयात उपचार घेत असताना वनिता बने यांची एक भावूक प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, मी आजवर पक्षाचे काम अत्यंत प्रामाणिकपणे केले आहे. पक्षासाठी संघर्ष करताना मागेपुढे पाहिले नाही, अनेक संकटे अंगावर घेतली. मात्र, आज ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबाला डावलण्यात आले, ते पाहता पक्षाने माझ्याशी मोठा अन्याय केला आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
