Advertisement
स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याची चर्चा
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने मात्र महायुतीला डावलून एक वेगळीच निवडणूक रणनीती आखली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीपासून वेगळे होऊन एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही, तर काही निवडक जागांवर ते थेट आपले काका शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार यांच्यासोबत थेट आघाडी करण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर हे वेगवेगळे गट असले तरी, स्थानिक पातळीवर पवार कुटुंबाचा प्रभाव कायम ठेवणे हा या मागील उद्देश असल्याची चर्चा आहे.
महायुतीच्या एकजुटीवर अजित पवार यांची नवीन खेळी थेट प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. अजित पवार यांनी त्यांच्या सर्वात मजबूत गडामध्ये युती धर्म पाळला नाही आणि ते आपल्या राजकीय विरोधक असलेले काका शरद पवार यांच्यासोबत गेले, तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर आघाडी घेणे अत्यंत कठीण होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ही एक नवी, गुप्त राजकीय खेळी तयार होण्याची शक्यता आहे.
महायुती किंवा महाविकास आघाडीच्या गुंतागुंतीच्या जागा वाटपाच्या वादांपासून दूर राहून, साहेब आणि दादा हे दोन्ही गट स्थानिक समीकरणांवर आधारित मजबूत उमेदवार उभे करतील, त्याचा फायदा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना होऊ शकतो, अशी रणनीती दोन्ही पवारांची दिसत आहे. विशेष म्हणजे त्याला दोन्ही बाजूने सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
