Advertisement
सोलापूर : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या न्यूरोफिजिशियल डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांना एका महिला कर्मचाऱ्याचे तीन फोन आले होते, असा दावा आरोपी मनीषा मुसळे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. यामुळे, आता या फोन कॉलचे तपशील आणि टॉवर लोकेशन तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात असा दावा केला आहे की, डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या दोन दिवस आधी, म्हणजेच 16 आणि 17 एप्रिलला, आर. राऊत नावाच्या महिला कर्मचाऱ्याने डॉ. वळसंगकर यांना अनेक वेळा कॉल केले होते. यामुळे, डिसेंबर 2024 ते 1 मे 2025 या कालावधीतील डॉ. वळसंगकर, पी. राऊत आणि आर. राऊत यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तसेच टॉवर लोकेशन तपासण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येनंतर पोलिसांना एक सुसाईड नोट आढळली होती. त्या सुसाईड नोटमध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप डॉ. वळसंगकर यांनी केला होता. सुसाइड नोटमध्ये त्यांनी लिहिले होते की, "ज्या माणसाला शिकवून मी आज ए.ओ. (प्रशासकीय अधिकारी) केले आणि चांगला पगार देत आहे. त्याने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे. त्याचे मला अतीव दुःख आहे. म्हणून मी माझे जीवन संपवत आहे." आता, मनीषा मुसळे यांच्या वकिलांच्या या नवीन दाव्यानं आणि त्यांनी केलेल्या सीडीआर तपासणीच्या मागणीमुळे या प्रकरणात एक नवीन आणि महत्त्वपूर्ण ट्विस्ट आला आहे.
