Advertisement
अकोला : विदर्भातील महापालिकांमध्येही महायुतीचे घटकपक्ष एकत्रच निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर, अकोला या महापालिकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचा शिक्कामोर्तब झाला आहे. तर, नागपूर आणि अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळ आजमावणार असून तिथे भाजपच्या साथीला रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष असणार आहे.|
शिवसेनेकडून विदर्भाची जबाबदारी असलेल्या उदय सामंत यांनीही शिवसेना महायुतीत लढण्यासाठी सज्ज असल्याचे सांगून विदर्भात महायुती म्हणूनच निवडणूक लढणार असल्याची ग्वाही दिली आहे. अमरावतीत राष्ट्रवादीने गेल्या तीन वर्षांपासून स्वबळाची तयारी केली आहे. तिथे रवी राणा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. भाजप नेत्यांच्याही रवी राणांविषयी छोट्या मोठ्या तक्रारी आहेत. पण नवनीत राणा भाजपमध्ये आणि त्यांचे पती रवी राणा युवा स्वाभिमानमध्ये असे कौटुंबीक स्वरुप युतीला आले आहे. रवी राणा तिथे भाजपचे छोटे भाऊ म्हणून काम करतील, असे रवी राणांनी सांगितल्याचे नवनीत राणा म्हटले. नगर परिषद निवडणुकीत भाजपने विदर्भात सरस कामगिरी केली. चंद्रपुरात भाजपची पिछेहाट झाली. पण ही पिछेहाट महापालिका निवडणुकीत भरून काढण्याची संधी भाजपला असणार आहे. यावेळी चंद्रपूर आणि अमरावतीत स्वकियांनी काही दगाफटका केला नाही तर भाजपचा विजयाचा वारु रोखण्याची ताकद विरोधकांमध्येही नसल्याचे पैजेवर सांगण्यात येते आहे.
