Advertisement
राष्ट्रवादी पुणे-पिंपरी महापालिकेसाठी एकत्र
पुणे : शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पुणे-पिंपरी महापालिकेसाठी एकत्र आली आहे. यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही कंबर कसली आहे. ठाकरेंची शिवसेना आता काँग्रेसलासोबत घेऊन पुणे महापालिकेत उतरणार आहे. पुणे-पिंपरीत विरोधक ठेवायचे नाहीत हे भाजपचे प्लानिंग आहे. महायुतीतून आम्ही इकडे लढू, तुम्ही तिकडे लढा असे त्यांचे ठरले, तो त्यांच्या स्टॅटर्जीचा भाग आहे. विरोधी पक्ष म्हणून सत्तेत परिवर्तन करायचे असेल तर काँग्रेस आणि उबाठा शिवसेनाच असू शकतो, असे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी सांगितले. पुणे महापालिकेत आम्हाला बहुमत मिळाले नाही तर आम्ही भाजपसोबत जाणार नाही, हे अजित पवारांनी जाहीर करावे. 15 दिवसांचा तात्पुरता घटस्फोट घ्यायचा, आम्ही बोलत नाही असं सांगायच आणि पुन्हा एकत्र यायचे, अशी टीका अहिर यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते अहिर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत पुणे पालिकेत केलेल्या आघाडीची माहिती दिली. आमची 2 वेळा राष्ट्रवादीशी चर्चा झाली. पण, काही उत्तर आले नाही. यामुळे आम्हाला उशीर झाला. आम्ही यावेळेस दक्ष होतो, असे सतेज पाटील म्हणाले.
पुण्यात पहिल्या टप्यात काँग्रेस 60 तर शिवसेना 45 जागांवर एबी फॉर्म देणार आहेत. फायनल यादी राञी उशिरा जाहीर केली जाणार आहे. मनसेनं आमच्याकडे 32 जागांची यादी दिली होती. आम्ही 20-21 जागांवर सहमती दर्शवली अजून 2-4 जागा मागे पुढे होऊ शकतात.आमची मनसेसोबत अजूनही चर्चा सुरु असल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली. आमचा फॉर्मुला तर ठरला आहे. जे घटक पक्ष आहेत, त्यांच्याविषयी आमच्या चर्चा सुरु असल्याचे आहिर यावेळी सांगितले. महापालिका ही स्वायत्त संस्था आपण मानतो. 29 ऑगस्टला कायदा करुन त्याचे अधिकार जॉइंट डायरेक्टर्सना देण्यात आलेय. तेच टाऊन प्लानिंग करतात. लोकशाही ही पालिकेत टिकली पाहिजे, असे विषय घेऊन आम्ही पालिका निवडणुकीत उतरणार असल्याचे आहेर यांनी सांगितले.
