Advertisement
मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. 28 ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी भुजबळ यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे सांगण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर नुकतेच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर भुजबळ यांची प्रकृती कशी आहे, असे विचारले जात होते. असे असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगांवकर यांनी भुजबळ यांची भेट घेतली आहे.
राज्यातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ साहेब यांची आज भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. यावेळी त्यांच्याबरोबर जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवसैनिक म्हणून काम करत असताना भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते होते. दोघांमधील सारखा दुवा म्हणजे “ठाकरे परिवार”. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांनीही मनापासून आनंद व्यक्त केला,’ अशी भावना बाळा नांदगांवकर यांनी व्यक्त केली.
त्यांची आणि माझी राजकीय विचारधारा नंतरच्या काळात वेगळी असली तरी ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याबद्दल मनात आदरच आहे. वयाच्या या टप्प्यात ही त्यांचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्यांचा लढवय्या स्वभाव. अनेकदा प्रवाहाविरोधात जाऊन लढणारे भुजबळ साहेब वयाच्या या टप्प्यात ही लढवय्ये आहेत. बाळासाहेब ठाकरे व एकूणच ठाकरे परिवारातील जुन्या आठवणी, आधीच्या काळातील केलेला संघर्ष त्यातून मिळविलेले यश, राजकारणाची बदलेली शैली याबद्दल ते मनापासून व्यक्त झाले. हॉस्पिटलमध्ये असले आणि शस्त्रक्रिया झाली तरी एकदम मनापासून ते व्यक्त होत होते. आम्ही दोघेही जुन्या गोष्टी आठवून भावूक झाले,’ असेही नांदगांवकर यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
