Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला उपाध्यक्षा अड. कोमलताइ साळुंखे-ढोबळे यांची मागणी
पुणे : राजकीय ५० टक्के आरक्षणाच्या मुद्यावर उच्च न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या निर्णयानुसार आयोग स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या की पुढे ढकलायच्या याचा निर्णय घेणार आहे, यामुळे राजकीय पक्षांसह, उमेदवरांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गेली तीन-चार वर्षे या निवडणुका रखडल्या आहेत. आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला उपाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे. यानुसार निवडणुकांबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे येत्या दोन दिवसांत ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांबरोबर बैठक घेणार आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानेच ३१ जानेवारीपूर्वी दिलेला असताना, अद्याप जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यां१च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही, त्यातच निवडणुका पुढे ढकलण्यात येणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. यातून ग्रामीण भागातील विकासावर विपरीत परिणाम होत असल्याचे ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका गेल्या चार वर्षांपासून रखडल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागाच्या विकासावर नकारात्मक परिणाम झालेला आहे. अनेक विकास योजना ठप्प पडल्या असून नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहिल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या गट आणि गणाची रचना अंतिम झालेली आहे. आरक्षणही अंतिम झालेले आहे. त्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. तसेच, या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध आव्हान याचिकांवरील सुनावणीत निवडणुकीला स्थगिती दिलेली नाही. याउलट, येत्या ३१ जानेवारीपर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानेच दिलेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका तातडीने घ्यावीत, याकडे ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी निवडणूक आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
