Advertisement
जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाची मानली जात असतानाच जामखेडच्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. राम शिंदे गटाच्या प्रांजल चिंतामणी यांनी रोहित पवारांच्या गटाच्या उमेदवार संध्या राळेभात यांना पराभूत केलं आहे. हा पराभव आमदार रोहित पवारांच्या जिव्हारी लागला आहे. जनतेने दोनदा मतांचं दान भरभरुन पदरात टाकलं, त्यांच्या मी कायम ऋणात राहिल, पण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि उमेदवारांनीही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली तरी आज लागलेला हा निकाल अत्यंत निराशाजनक आणि काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे, असं शरद पवारांच्या पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांनी म्हटलं आहे. जनतेवर आक्षेप नाही पण सगळीकडे पैसाच चालत असेल तर बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार आणि इतर अशा राजकीय दृष्टीकोनातून दुर्लक्षित आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारांना आम्ही सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्नच आहे, अशा शब्दांमध्ये रोहित पवार यांनी निराशा व्यक्त केली आहे.
कारनामे आणि धंदे बघितले तर...
\आज तत्व आणि विकासावर चालणारं स्वच्छ राजकारण कमी आणि पैशांनी गढूळ झालेलंच अधिक दिसतं. म्हणूनच आमच्या विरोधात निवडून आलेल्या काही लोकांचे कारनामे आणि धंदे बघितले तर चारचौघात त्या धंद्यांचं नाव घेण्याचीही लाज वाटते, मग अशा परिस्थितीत डोक्यात विचारांचं काहूर उठल्याशिवाय राहत नाही, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
