#

Advertisement

Thursday, January 29, 2026, January 29, 2026 WIB
Last Updated 2026-01-29T14:17:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

12 जिल्हा परिषद निवडणुकींची तारीख बदलली

Advertisement

7 फेब्रुवारीला मतदान :  9 फेब्रुवारीला निकाल 

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष लागून असलेल्या मतदारांसाठी आणि राजकीय पक्षांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात नवा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
कधी होणार निवडणूक? : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या तारखेत बदल झाल्यामुळे साहजिकच मतमोजणीच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांचा निकाल आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर केला जाईल.

मतदान आणि मतमोजणीची नवी वेळ

नवीन वेळापत्रकानुसार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालेल. मतदानाच्या 48 तास आधी म्हणजेच 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता जाहीर प्रचाराची तोफ थंडावणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होताच संबंधित निवडणूक क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल. तसेच, निवडून आलेल्या नवीन सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जातील.