Advertisement
लोकभवनात साधेपणाने झालेल्या कार्यक्रमात घेतली
मुंबई : सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.अजित पवार यांच्या अपघाती निधानंतर हे पद रिक्त झालं होतं. त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटाच्या बैठकीनंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबतचे राज्यपालांना पाठवले. लोकभवनात साधेपणाने हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेटमधील अन्य मंत्री उपस्थित होते. पवार परिवारातील अन्य सदस्य म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. सुनेत्रा पवार यांचा पक्ष वेगळा असून त्या उपमुख्यमंत्री होण्याबाबत आपला कोणताही सल्ला घेण्यात आला नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सुनेत्रा अजित पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. त्या राजकारणासाठी नवीन नाहीत, कारण त्यांचे माहेर देखील एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहे. त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे राज्याचे माजी मंत्री आणि लोकसभा खासदार राहिले आहेत.
राजकारणात प्रत्यक्ष पद स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी सामाजिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. त्यांनी 'एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया' या संस्थेची स्थापना करून सेंद्रिय शेती आणि ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी योगदान दिले आहे. यासोबतच त्या बारामतीमधील महत्त्वाच्या संस्थांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या देखील सांभाळत आहेत.
