Advertisement
राज्य निवडणूक आयोगाने केले स्पष्ट
मुंबई : महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन आदेश काढलेला नाही असं स्पष्ट केले आहे. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगाने 14 फेब्रुवारी 2012 मध्येच निर्गमित केलेला आहे असं ही आयोगा तर्फे सांगण्यात आलं आहे.
जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नवीन नियम लागू केला अशा बातम्या समोर आल्या. शिवाय यावरून विरोधकांनी ही टिकेची झोड उठवली. काही बातम्या ही प्रसारीत झाल्या. पण ही वस्तुस्थितीला धरुन नाही असं मत राज्य निवडणूक आयोगाने व्यक्त केलं आहे. याबाबतचा आदेश हा जुनाच आहे. त्या 14 फेब्रुवारी 2012 रोजीच्या आदेशानुसार जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून आणि घरोघरी जाऊन प्रचार करु शकतील असं या आदेशात आहे. परंतु माईकचा वापर करता येणार नाही. शिवाय उमेदवारांना समुहानेदेखील फिरता येणार नाही, असं या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे घरोघरी जावून प्रचार करण्याचा कोणताही नवा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला नाही. तो जुनाच निर्णय असल्याचं आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या आदेशाबाबत मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आरोप केला आहे. सरकारला मदत करण्यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. दुसऱ्या दिवशी 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटता येईल, मात्र पत्रके वाटता येणार नाहीत. असा नियम कशासाठी? याचा अर्थ तुम्ही पैसे वाटू शकता असा होतो का?" असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
