Advertisement
पिंपरी : राज्यात तिकीट वाटपानंतर अनेक ठिकाणी उमेदवारांची रडारड पाहायला मिळाली. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये दोन उमेदवार चक्क नशिबवान ठरले. कारण त्यांना एका नव्हे तर दोन पक्षांकडून अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांनी त्यांना एबी फॉर्मही दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २० ‘ब’ आणि ३० ‘अ’ या दोन जागांवर हा अनोखा पेच निर्माण झाला आहे. प्रभाग २० ‘ब’ साठी नीलम म्हात्रे यांना शरद पवार गट राष्ट्रवादी आणि ठाकरे गट शिवसेना -दोन्हींकडून एबी फॉर्म मिळाले आहेत. तर प्रभाग ३० ‘अ’ साठी संदीप गायकवाड यांना शरद पवार गट राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेना -या दोन्ही पक्षांनी उमेदवारी दिली आहे. नियमाप्रमाणे या उमेदवारांनी एका पक्षाचा एबी फॉर्म जोडून अर्ज दाखल करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी दोन्ही पक्षांचे एबी फॉर्म जोडून अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे छाननीत हे दोन्ही अर्ज वैध ठरले. त्या टप्प्यावर एका पक्षाची उमेदवारी मागे घेण्याची संधी होती, पण तीही वापरण्यात आली नाही. त्यामुळे आता अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत या दोघांकडे एका पक्षाची उमेदवारी सोडण्याचा पर्याय असणार आहे.
